दुबई-तेल अवीव विमानात थरार; वैमानिकाकडून विमान क्रॅशच्या प्रयत्नानंतर कॉकपिटमध्ये हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईचे विमानाचे बुधवारी सकाळी अपहरण झाल्याचे म्हटले जात होते. परंतु आता मात्र याबाबत एक नवीन बाब समोर आली आहे. विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला नसून, कॉकपिटमधील एका वैमानिकाने विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आता करण्यात येत आहे. दुसऱ्या वैमानिकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये कॉकपिटमध्ये झटापट झाल्याचे वृत्त आहे. या झटापटीदरम्यान विमानातून एअर ट्रॅफिक कंट्रोलला आपत्कालीन संकेत पाठवण्यात आला. त्यानंतर इस्रायली सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. प्रवाशांच्या माहितीनुसार, दुसऱ्या वैमानिकाने क्रू सदस्य आणि काही प्रवाशांच्या मदतीने संबंधित वैमानिकाला नियंत्रणात आणले.

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार या गोंधळात काही प्रवासी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. एका इस्रायली प्रवाशाने सांगितल्यानुसार, कॉकपिटमधून आरडाओरड ऐकू आली. एका वैमानिकावर चाकूने हल्ला झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्याचवेळी विमान अचानक खाली येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि काही जण प्रार्थना करू लागले. घटनेनंतर विमान मॅन्युअल कंट्रोलवर घेण्यात आले आणि त्याचा मार्ग सौदी अरेबियाच्या दिशेने वळवण्यात आला. काही काळ विमानाशी संपर्क तुटल्याचेही सांगण्यात आले. बेन गुरियन विमानतळावर उतरण्याची परवानगी न मिळाल्यानंतर अखेर विमानाने सौदी अरेबियात लँडिंग केले.

इस्रायली माध्यमांच्या माहितीनुसार विमानात 24 मुलांसह 174 जण प्रवास करत होते. मात्र, विमानातील नेमकी घटना आणि वैमानिकांच्या कृतीबाबत अधिकृत तपास सुरू असून, या दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.