
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची पदकांची लयलूट सुरूच आहे. बुधवारी हिंदुस्थानच्या महिला तीरंदाज संघाने कंपाऊंड प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या महिला संघाने चीनचा 238-234 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयासह हिंदुस्थानच्या महिला संघाने जागतिक विक्रमाचीही बरोबरी करण्याचा पराक्रम केला आहे.
ज्योति सुरेखा वेन्नम, चिकिथा तानीपार्थी आणि पृथिका प्रदिप या हिंदुस्थानी त्रिकुटाने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. 240 पैकी 238 गुणांची कमाई करत हिंदुस्थानी संघाने 2014 च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत दक्षिण कोरियाने केलेल्या जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली.
अंतिम सामन्यात हिंदुस्थानी तीरंदाजांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला. पहिल्या फेरीत 60 पैकी 60 गुण मिळवत हिंदुस्थानने 60-58 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीतही आपली लय कायम राखत हिंदुस्थानने 60-58 अशा गुणांसह आघाडी वाढवली. तिसऱ्या फेरीअखेर हिंदुस्थानकडे 178-176 अशी 2 गुणांची निसटती आघाडी होती. शेवटच्या आणि निर्णायक फेरीत चीनच्या खेळाडूंवर दडपण स्पष्ट दिसत होते. चीनकडून दोन 9 गुण नोंदवले गेले, तर दुसरीकडे हिंदुस्थानी महिलांनी उत्कृष्ट कामगिरी करत 6 पैकी 6 परफेक्ट 10 लगावले आणि सुवर्णपदकासह जागतिक विक्रमाला गवसणी घातली.
The Indian women’s compound archery team has won a gold medal at the 2026 Asian Games after defeating China 238–234 in the finals. The team equalled the World Record in achieving this feat. pic.twitter.com/nwaHTmI1Cf
— ANI (@ANI) September 30, 2026
कोरियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश
यापूर्वी ओकाझाकी च्युओ सोगो पार्क येथे झालेल्या उपांत्य फेरीत हिंदुस्थानने दक्षिण कोरियाचा 234-233 असा एका गुणाच्या फरकाने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेत उ नियर, युई वांग आणि फॅंगयाओ वेई यांच्या चिनी संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर पार्क जंगयुन, पार्क येरिन आणि कांग येओन्सीओ यांच्या दक्षिण कोरियन संघाने चीनी तैपेईचा पराभव करत कांस्यपदक पटकावले.
सातवे सुवर्णपदक
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील हिंदुस्थानचे हे सातवे सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी 2023च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही हिंदुस्थानी महिला कंपाऊंड संघाने सुवर्णपदक जिंकले होते. हिंदुस्थआनने गेल्या आवृत्तीत तीरंदाजीत तब्बल 5 सुवर्णपदके आपल्या नावे केली होती.






























































