
म्यानमारच्या लष्कराने पश्चिम रखाइन राज्यातील बंडखोर गटाच्या ताब्यात असलेल्या भागातील बाजारपेठेजवळ केलेल्या हवाई हल्ल्यात 49 जणांचा मृत्यू झाला असून 58 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला, देशभरात लोकशाही समर्थक बंडखोर गट आणि वांशिक सशस्त्र गटांविरुद्ध झालेला नवीनतम हल्ला आहे. मृतांमध्ये विक्रेते, खरेदीसाठी आलेले ग्राहक आणि पादचाऱ्यांचा समावेश आहे. क्योकटाव टाउनशिपमधील हा हल्ला म्यानमारमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षादरम्यान झालेला सर्वात प्राणघातक हवाई हल्ला आहे.
अराकान आर्मी आणि स्थानिक बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास एका लढाऊ विमानाने स्थानिक बाजारपेठेजवळ दोन बॉम्ब टाकले. या हल्ल्यात 49 जण ठार झाले आणि 58 जण जखमी झाले. जखमींपैकी 22 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. ही बाजारपेठ या भागातील मुख्य घाऊक व्यापार केंद्र आहे आणि येथे रखाइन राज्यातील विविध भागांतून व्यापारी व खरेदीदार येतात, असेही त्यांनी नमूद केले.





























































