
कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या प्रस्तावित ठाकुर्ली उड्डाणपुलाचे ‘ग्रहण’ अखेर संपले आहे. गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कामातील मोठा अडथळा दूर झाला असून उड्डाणपुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या 82 रहिवाशांचे स्थलांतर आजपासून सुरू करण्यात आले. रहिवाशांनी घरे रिकामी केल्यानंतर संबंधित बांधकामे पाडल्यानंतर उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
म्हसोबा चौक ते ठाकुर्ली रेल्वे स्थानक या मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वाहनचालक तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी समांतर रस्त्यावर ठाकुर्ली उड्डाणपूल उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पाचे काम गेल्या 13 वर्षांपासून रखडले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी बाधित रहिवाशांसोबत अनेक बैठका घेतल्या.
या बैठकीत पुनर्वसनाबाबत तोडगा काढण्यात आला. बाधित रहिवाशांपैकी काहींना बारावे येथील बीएसयूपी प्रकल्पात तर काहींना खंबाळपाडा येथील बीएसयूपी प्रकल्पात घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच संबंधित जागामालकांना टीडीआरच्या माध्यमातून मोबदला देण्याबाबत करार करण्यात आला आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर बाधित रहिवाशांनी आपली घरे रिकामी करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार सोमवारी 82 बाधित रहिवाशांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
36 कोटींचा निधी
उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे 36 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतरही प्रकल्पाच्या मार्गातील 82 बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळत नव्हती. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे हे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. अखेर पुनर्वसनाचा तिढा सुटल्यामुळे पुलाचे काम मार्गी लागणार आहे.




























































