
पेणच्या उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी तसेच बेशिस्त कारभार यामुळे सर्वसामान्य रुग्ण व नातेवाईक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयाचा कारभार लवकरात लवकर सुधारला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक निशिकांत पाटील यांना दिला.
पेण उपजिल्हा रुग्णालयातील शवगृह गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्याशिवाय प्रसूतितज्ज्ञ डॉक्टरांचे पदही रिक्त असून शवगृहाच्या परिसरात उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे. मृतदेह ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्थादेखील नाही. येथील गैरसोयींची दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. आता आक्रमक पवित्र घेण्यात आला आहे.
दहा दिवसांची मुदत
लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक निशिकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच रुग्णालयाचा कारभार लवकरात लवकर सुधारावा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या दहा दिवसांत कारभार सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना जिल्हा सल्लागार सतीश पाटील, तालुकाप्रमुख शंकर गुरव आदी उपस्थित होते.





























































