धडक देताच भीषण अपघात: बोरघाटात कंटेनर, टेम्पो कोसळला; चालक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खंडाळा बोरघाटात आज सकाळी एका मालवाहू कंटेनरने टेम्पोला मागून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही वाहने सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने समोरील टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने चालकांच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट बोरघाटाच्या ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही वाहने दरीत कोसळल्याने बचावकार्य करताना अनेक अडचणी आल्या. पथकाने मोहम्मद कैफ या चालकाचा मृतदेह बाहेर काढून खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान टेम्पो दरीच्या भागात अडकून राहिल्याने चालक मात्र वाचला.

कार लादीच्या ढिगाऱ्यावर आदळली; ड्रायव्हरचा मृत्यू

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथे पहाटेच्या सुमारास कार लादीच्या ढिगाऱ्यावर जोरदार आदळली. या अपघातात कारचालक अक्षय कदम (३०) याचा मृत्यू झाला तर कारमधील रोहित धाडवे आणि रोशन धाडवे हे दोघे जखमी झाले आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आपदा मित्र आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना कारमधून बाहेर काढून तातडीने माणगाव सरकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.