
देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे, तिरंगा उंचवायचा आणि मायदेशी परतल्यानंतर आपल्या कर्तृत्वासाठी राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार मिळणाऱ्या पुरस्काराची रक्कम केवळ 42 लाख रुपये असल्याचे समोर यायचे… महाराष्ट्राच्या सुवर्णपदकविजेत्या कबड्डीपटू अस्लम इनामदार आणि सोनाली शिंगटे यांच्या मनात याच तफावतीची खंत आहे. मात्र राज्य सरकार आपल्यावर अन्याय करणार नाही, उलट आपल्या कर्तृत्वाचा योग्य सन्मान करेल, असा विश्वास या दोन्ही सुवर्णविजेत्यांनी मायदेशी परतल्यानंतर व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या नव्या पुरस्कार धोरणातील सांघिक खेळाच्या सूत्रानुसार आशियाई क्रीडा स्पर्धेतील 12 सदस्यीय कबड्डी संघासाठी वैयक्तिक सुवर्णपदकाच्या पुरस्काराच्या पाचपट रक्कम संघातील खेळाडूंमध्ये विभागली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका खेळाडूच्या वाटय़ाला सुमारे 42 लाख रुपये येतात. ही तरतूद आता क्रीडा क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र दुसरीकडे अस्लमचे संघ सहकारी असलेल्या हरयाणवी आणि यूपीच्या खेळाडूंना प्रत्येकी तीन-तीन कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे राज्याच्या सुवर्णविजेत्यांना दिल्या जाणाऱया रोख पुरस्काराबाबत राज्य सरकारने फेरविचार करावी, अशी मागणी खुद्द माजी अर्जुनविजेत्या खेळाडूंसह कबड्डी क्षेत्रातून केली जात आहे.
ही तफावत धक्कादायक
मायभूमीवर परतल्यानंतर पुरस्काराची रक्कम कळली तेव्हा अस्लम इनामदारने आपली नाराजी व्यक्त केली. माझ्या हरयाणवी आणि उत्तर प्रदेशच्या सहकाऱयांना थेट तीन कोटी रुपये मिळणार आहेत आणि मला फक्त 42 लाख रुपये. ही तफावत नक्कीच धक्कादायक आहे. हा माझ्या खेळावर अन्यायच आहे. मात्र क्रीडा मंत्री आणि मुख्यमंत्री या बाबीची दखल घेतील आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंनाही सन्मानाची पुरस्कार रक्कम मिळेल असा मला विश्वास असल्याचे अस्लम म्हणाला.
सोनाली शिंगटे म्हणाली, राज्याने कधीच कबड्डीपटूंवर अन्याय केलेला नाही. मी गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही सरकारने माझा यथोचित सन्मान केला. मला सव्वादोन कोटी रुपये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. आता सुरू असलेली आशियाई क्रीडा स्पर्धाही त्याच तोडीची आहे. राज्याने नुकतेच नवे पुरस्कार धोरण जाहीर केले असले तरी सरकार आपल्या खेळाडूंवर अन्याय करणार नाही, असा विश्वासही सोनालीने बोलून दाखवला.
ही तर अपमानास्पद वागणूक
राज्य सरकारने नव्या रोख पुरस्कार धोरणाचा शासन निर्णय जाहीर करताना त्यामागचा उद्देश खेळाडूंना प्रोत्साहन देणे असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र कबड्डीसारख्या सांघिक खेळातील सुवर्णविजेत्याच्या वाटय़ाला येणारी 42 लाखांची रक्कम पूर्वीच्या पुरस्कारांच्या तुलनेत कमी असल्याने या धोरणावर क्रीडा क्षेत्रातून प्रश्न उपस्थित होत आहेत. 2023च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर कबड्डीपटू अस्लम इनामदारला 75 लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर 2025मध्ये ढाका येथे झालेल्या महिलांच्या दुसऱया कबड्डी विश्वचषकात जगज्जेत्या हिंदुस्थानी संघातील महाराष्ट्राच्या सोनाली शिंगटेला सव्वादोन कोटी रुपयांचा रोख पुरस्कार मिळाला होता. एवढेच नव्हे, तर 2012मध्ये महिलांच्या पहिल्या कबड्डी विश्वचषकात महाराष्ट्रातील दीपिका जोसेफ आणि सुवर्णा बारटक्के यांचा हिंदुस्थानी संघात समावेश होता. त्यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये देऊन गौरविण्यात आले होते. हे पुरस्कार पाहता आता दिला जाणारा पुरस्कार प्रोत्साहनापेक्षा अपमानास्पद वागणूकच अधिक वाटत असल्याची भावना कबड्डी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.























































