
संत झेवियर महाविद्यालय, मुंबईच्या ‘मराठी वाङ्मय मंडळा’ने ‘नटरंग उभा’ या संकल्पनेवर आधारित आपला २०२६ चा बहारदार उद्घाटन सोहोळा सादर केला. पिढ्यानपिढ्या विकसित होत आलेल्या मराठी रंगभूमीचा प्रवास एका आजोबा आणि त्यांच्या नातीमधील संवादातून उलगडण्यात आला.
कार्यक्रमातून मराठी रंगभूमीच्या पारंपरिक आणि ऐतिहासिक मुळांपासून ते सामाजिक बदल, नवनवीन कल्पना आणि प्रयोगांमधून आकार घेतलेल्या समकालीन स्वरूपापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला. कार्यक्रमात संगीत, नृत्य, साहित्य, नाटक आणि कला यांचा सुरेख संगम साधत रंगभूमीची बदलती रूपे आणि तिचे कथाकथनाशी असलेले नाते अधोरेखित करण्यात आले.
पाच भागांमध्ये सादर झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात नाट्य विभागाने समकालीन नाटकापासून प्रेरित कथानकाद्वारे केली. त्यानंतर नाट्य आणि ललित कला विभागांनी ‘दशावतार’ शैलीतील नाट्यविश्व साकारले. वेशभूषा, रंगभूषा आणि ‘वराह’ अवताराच्या कथानकातून या पारंपरिक नाट्यप्रकाराचे विविध पैलू उलगडण्यात आले.
संगीत विभागाने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि नाट्यकलाकार जयमाला शिलेदार यांना आदरांजली वाहणारे संगीतनाटक सादर केले. साहित्य विभागाच्या ‘सामाजिक-राजकीय नाटक’ या उपक्रमातून कला आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांचा वेध घेण्यात आला. आपल्या विचारांमुळे विरोधाचा सामना करणाऱ्या एका लेखकाच्या प्रवासातून कलाकार सामाजिक विषय मांडण्यासाठी रूपक आणि सादरीकरणाचा वापर कसा करतात, हे ह्यातून दाखवण्यात आले.
‘तमाशाची सम्राज्ञी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठाबाई नारायणगावकर यांचा वारसा जपणारा ‘तमाशा’ हा प्रकार नृत्य विभागाने सादर केला. महाराष्ट्राच्या लोकनाट्य परंपरेतील ऊर्जा आणि सांस्कृतिक संपन्नता रंगमंचावर साकारत या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.



























































