
मुंबईत आयोजित पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यायचं असेल तर आमच्यात या, आम्ही कुणाच्यात जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे आणि विलिनीकरणाच्या चर्चा करणाऱ्यांना फटकारले.
प्रदेशाध्यक्षांनी बोलता बोलता एक वाक्य वापरलं की, आपसामध्ये काही उलटसुलट चर्चा आहे. पक्षाचा प्रमुख म्हणून मी सांगतो. चर्चा आहे… कसली चर्चा? शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शक्तिशाली आम्ही करणार. तुम्ही आमच्या जवळ आले, तर जवळ येणार नाही. यायचं असेल तर आमच्यात या, आम्ही कुणाच्यात जाणार नाही. आणि आम्ही पक्ष मजबूत करणार. हा निर्धार केला आहे, असे शरद पवार म्हणाले.
दुष्काळाच्या या संकटात राजकारण करण्याची ही वेळ नाही- शरद पवार
या संकटात राजकारण करण्याची ही वेळ नाही. या संकटात संकटग्रस्ताला मदत करण्याची ही वेळ आहे. आणि ही जबाबदारी घेऊन काम करायचं, असं हे संकट आहे. आमदार, खासदार, पदाधिकारी एकत्र बसलो आणि जे मुद्दे सहकाऱ्यांनी सांगितले त्यावर आधारित एक पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. अपेक्षा ही होती की राज्य सरकार त्यात आणखी सुधारणा करून काही निर्णय घेईल. काही निर्णय घेतले पण ते पुरेसे नाहीत. यानंतर आम्ही काल पुन्हा काही तास बैठक घेतली आणि आणखीन काही महत्त्वाच्या मागण्या जिल्ह्यांमधून ऐकायला मिळाल्या. त्यावर आधारित पुन्हा एक नवीन प्रस्ताव राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठवला. त्यानंतर सरकारकडून काही निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे. सरकारकडून काही ठराविक काळात त्याच्यावर कार्यवाही झाली नाही तर पुढचं पाऊल यासंबंधी काय पाऊल टाकायचं याची कल्पना त्यांनी आपल्याला दिली. हे करत असताना खासदार म्हणून आणखी एक जबाबदारी आम्ही घेऊ शकतो. एक म्हणजे राज्य सरकारशी संबंधित प्रश्न मांडणं, निर्णय घेणं, तुमचे हात बळकट करणं आणि अडचणीच्या माणसाला मदत करणं. हा निर्णय महाराष्ट्रापुरता सीमीत राहील. पण काही निर्णय दिल्लीला होतात. मी केंद्र सरकारमध्ये असताना दुष्काळ पडला आणि डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. आणि सगळ्यांनी सांगितलं या दुष्काळात काय निर्णय घ्यायचे याचे सर्व अधिकार पवारसाहेबांना द्या. फक्त अधिकार नाही तर मंत्रिमंडळाची संमती न घेता निर्णय घ्यायचा अधिकार तिथे द्या आणि ते मला दिले होते, असे शरद पवार यांनी सांगितले.
प्रश्न जर सोडवले नाही तर…, दुष्काळाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांचा सरकारला इशारा
शेतकरी, गरीब, शेतमजूर, दलित, आदिवासी, छोटे व्यावसायिक यांना आधार द्यायता की नाही? त्यांना आधार दिला नाही तर समाजातले किती टक्के लोक या संकटात मदती केली नाही म्हणून वंचित राहतील? याची जाण सरकारला यायला आपण भाग पाडलं पाहिजे. सरकारचे जे काही निर्णय आहेत यावर प्रदेशाध्यक्ष आणि इतर सहकाऱ्यांच्या बरोबर बसून आणि केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्या जीआरमध्ये अधिक सुधारणा केल्या. आणि तो राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. दोन-चार दिवसांत आम्ही सरकारकडे जाऊ आणि हा आग्रह करू. आम्ही भांडण करणार नाही. आम्हाला पहिले प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. प्रश्न जर सोडवले नाही तर रस्ता कोणता घ्यायचा हे प्रदेशाध्यक्ष ठरवतील. आणि त्यात रस्त्यावर यायचं, संघर्ष करायचा आणि संघर्ष करून जे करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
























































