
कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी पालघर जिल्हा आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. उद्या 28 सप्टेंबरपासून ते 14 ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम राबवली जाणार असून 1 हजार 754 पथके तयार केली गेली आहेत. यामुळे आता लवकरच पालघर जिल्हा कुष्ठरोगमुक्त होणार आहे. ही पथके घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून कुष्ठरुग्णांचा शोध घेणार आहेत. त्यासाठी आशासेविका, स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.
कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागांतील 5 लाख 30 हजार 629 लोकसंख्येचे सर्वेक्षण गृहभेटी देऊन करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 754 पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 352 सुपरवायझर नेमले आहेत. मोहिमेंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोगसंदर्भात संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करण्याचे उद्दिष्ट ठेण्यात आले आहे.
सर्वेक्षण, रुग्णांची नोंदणी पालघर
कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मोहिमेचे नियोजन, क्षेत्रीय पथकांची नियुक्ती, संशयित रुग्णांचा शोध, संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण, रुग्णांची नोंदणी आणि उपचार व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
घरोघरी भेट देण्याचे नियोजन, संशयित रुग्णांची ओळख, रुग्णांची नोंदणी, संदर्भ सेवा, उपचाराची उपलब्धता आणि मोहिमेचे अहवाल सादरीकरण याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. अशोक गवळी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


























































