सणासुदीला महागाईचा आणखी एक झटका, दसरा-दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांची दरवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांच्या किमती 1 ऑक्टोबरपासून वाढणार आहेत. कंपन्या एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही यासारख्या उपकरणांच्या किमतींमध्ये सुमारे आठ टक्के वाढ करणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महागाईत वाढ होत आहे. कच्च्या तेलाचे दर वाढलेले असल्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. वाढलेले गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर, साखर, खाद्यतेल, दूध, भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत. महागाईपासून लवकर दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच सणासुदीच्या तोंडावर कंपन्या घरगुती उपकरणांच्या किमतीत वाढ करणार आहेत. या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांच्या किमती 23 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. त्यातच आता ही दरवाढ होऊ घातली आहे.

विक्रीवर कमी परिणाम होण्याचा दावा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तांबे, स्टील, अ‍ॅल्युमिनियम तसेच कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. याशिवाय परकीय चलनदेखील महाग झाले आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू महागणार आहेत. या दरवाढीचा सणासुदीच्या विक्रीवर कमी परिणाम होईल, असा कंपन्यांचा दावा आहे. बहुतांश विक्रेते आणि वितरकांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जुना स्टॉक खरेदी करून ठेवला आहे.

असे वाढणार दर

एसी ः 5 ते 8 टक्के
वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही ः 3 ते 4 टक्के