
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनावर जिल्हा सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. सांगली, जत आणि कवठेमहांकाळ अशा तीन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय फेरसुनावणीनंतर कायम करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात बाजार समितीचे विद्यमान संचालक मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा आव्हान देणार आहेत.
राज्य शासनाने 6 एप्रिल 2026 रोजी सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू करून तीन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन केल्या होत्या. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त झाले होते. या निर्णयाविरोधात संचालकांसह शेतकरी संघटना, ग्रामपंचायती आणि विकास सोसायटय़ांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर त्रिभाजनाबाबत फेरसुनावणी घेण्यात आली. बाजार समिती प्रशासन, संचालक मंडळ, तसेच संबंधितांकडून अभिप्राय मागवण्यात आले. सर्व संचालकांनी आपले म्हणणे जिल्हा सहकार उपनिबंधकांकडे सादर केले. पणन विभागानेही त्रिभाजन कायम ठेवण्याच्या बाजूने अहवाल दिला होता.
दरम्यान, अंतिम निर्णयासाठी जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण यांना न्यायालयाकडून मुदत देण्यात आली होती. तीन वेळा मुदतवाढ घेतल्यानंतर त्यांनी त्रिभाजन करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळास पुन्हा धक्का देण्यात आला.
त्रिभाजनाविरोधात हायकोर्टात आव्हान देणार – आनंदराव नलवडे
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाबाबतची पुन्हा अधिसूचना मिळाली. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सांगली बाजार समितीचे त्रिभाजन प्रत्यक्षात कितपत पुढे जाईल आणि न्यायालयीन प्रक्रियेत आम्हाला पुन्हा यश येईल, असा विश्वास बाजार समितीचे सभापती आनंदराव नलवडे यांनी व्यक्त केला.




























































