
आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी राजीनामा द्यावा यासह आदिवासी समाज व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी कृती समिती आक्रमक झाली आहे. मुंबईतील राजभवनावर धडक देण्यासाठी सोमवारी, 28 सप्टेंबरपासून नाशिक येथून हजारो विद्यार्थी पायी लाँग मार्च काढणार आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारत या आंदोलनाला हरकत घेतली आहे.
आदिवासी आश्रमशाळांची दैन्यावस्था, भ्रष्ट व अनागोंदी कारभार, विद्यार्थी मृत्यू, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची झालेली परवड याची जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक वुईपे यांनी राजीनामा द्यावा, सर्पदंशाने मृत्यू झालेल्या गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये, जखमींना पन्नास लाख रुपये अर्थसहाय्य करावे यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी कृती समिती, सकल आदिवासी समाजाच्या वतीने काही महिन्यांपासून आंदोलने सुरू आहेत. उपोषण, धरणे धरूनही सरकार मागण्या मान्य करीत नाही, यामुळे विद्यार्थी कृती समिती आक्रमक झाली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत राजभवनावर धडक देण्यात येईल, असा इशारा पूर्वीच देण्यात आला होता. शासनाने दखल न घेतल्याने विद्यार्थी लाँग मार्चवर ठाम आहेत.
ईदगाह मैदानापासून विद्यार्थ्यांचे उलगुलान सुरू होईल. नाशिकसह राज्यभरातील हजारो विद्यार्थी व आदिवासी बांधव मुंबईत राजभवनाकडे जाण्यासाठी पायी लाँग मार्च काढणार आहेत, अशी माहिती सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीने दिली. यावेळी विवेक गावीत, सागर पावरा, विक्रम गव्हाने, प्रशांत गावंढे, राहुल पावरा, सोनू गायकवाड, पांडुरंग गायकवाड आदी उपस्थित होते. आश्रमशाळांना निकृष्ट जेवण देणारे सेंट्रल किचन बंद करावे, आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आश्रमशाळांना मूलभूत सुविधा देऊन प्रश्न सोडवावेत, स्वतंत्र योजनेतील प्रलंबित डीबीटी तातडीने वितरीत करावे, विद्यार्थ्यांना वाढीव अर्थसहाय्य द्यावे, आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव, आयुक्त यांची त्वरित बदली करावी, आदिवासी विकास विभागातील प्रशासकीय प्रश्न सोडवावेत, आश्रमशाळांमधील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी, जखमींना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
पोलिसांची मनाई
सिंहस्थ पुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये या ठिकाणी जाण्यास या आंदोलनाने अडथळा निर्माण होईल. नाशिक-मुंबई महामार्गावरही रस्त्याचे काम सुरू आहे. लाँग मार्चमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडसर येईल, ही कारणे देत पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या या पायी लाँग मार्चला हरकत घेतली आहे. मुंबई नाका पोलिसांनी नोटीस बजावून आंदोलनाला मनाई केली आहे.




























































