
पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी सोमवार 28 सप्टेंबरपासून पुकारलेला तीन दिवसांचा संप टळला आहे. इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
शनिवार आणि रविवारी सुट्टी जाहीर करण्याबाबत दोन्ही संघटनांची तत्काळ उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती सर्व संबंधित घटकांसोबत चर्चा करेल. तसेच सर्व पर्यायांचा विचार करून सर्वमान्य तोडगा काढेल. यात ग्राहकांच्याही हितांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, त्यांनाही मान्य असेल असा तोडगा काढण्यात येईल, असे कर्मचारी महासंघाने एका निवेदनाद्वारे सांगितले. संपाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 10 वर्षांनी रविवारी सरकारी बँकांमध्ये कामकाज सुरू होते. रविवारी दिवसभर बँकांमध्ये ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळाली. दरम्यान, संप टळल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


























































