अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक;बिनविरोधसाठी सर्वपक्षीय नेते सकारात्मक, संगमनेरमधील बैठकीत भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ahilyanagar-district-bank-board-dismissed-administrator-appointed-election-signals

अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने, तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजवर जपलेली सहकाराची आणि राजकारणविरहित वाटचाल लक्षात घेता, बँकेची निवडणूक टाळून ती बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करावेत, अशी भूमिका आज संगमनेरमध्ये झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर येथे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची बैठक झाली. या बैठकीस माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार डॉ. सुजय विखे- पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते.

आमदार मोनिका राजळे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी बैठकीस ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून या सकारात्मक भूमिकेला पाठिंबा दर्शवला. अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यापूर्वीही जिह्यातील समविचारी मंडळींनी अनेक वेळा जपली आहे. त्याच परंपरेला पुढे नेत राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा बँक ही जिह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होणारी अनावश्यक राजकीय स्पर्धा टाळून बँकेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे पुढे न्यावे, तसेच बँकेची प्रगती आणि जिह्यातील सहकार क्षेत्राची भक्कम वाटचाल कायम राहावी, या सकारात्मक हेतूने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.

जी नेतेमंडळी आपल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकली नाही, तसेच ज्यांच्यासोबत संपर्क झाला नाही, त्या सर्वांशी समन्वय साधून त्यांना या भूमिकेसोबत घेण्याचा प्रयत्न राहील.

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

– जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया उद्यापासून (दि. 28) सुरू होत आहे. 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 6 ऑक्टोबरला अर्जांची छाननी, 7 ते 21 ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 22 ऑक्टोबरला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 नोव्हेंबरला मतदान, तर 3 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बँकेच्या 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.