
राज्यभरात दुष्काळाचे संकट असताना मुंबईकरांना मात्र पाण्याचा दिलासा मिळणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 97 टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने मुंबईची पाणीकपात रद्द होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सध्या मुंबईच्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा आहे. जून महिन्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे तलावांतील पाणीसाठा खालावला होता. त्यामुळे महापालिकेने 10 टक्के पाणीकपात लागू केली होती. ही पाणीकपात कधी उठणार आणि मुंबईकरांना दिलासा कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या की, सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. आपण जी पाणीकपात लागू केलेय, ती मागे घेण्याची घोषणा लवकरच पत्रकार परिषद घेऊन करण्यात येईल. पुरेसा पाऊस झाल्याने आपले ऑगस्ट 2027पर्यंत पाण्याचे नियोजन झाले आहे. याशिवाय पाण्याचा राखीव साठादेखील उपलब्ध आहे. त्यामुळे अडचण येणार नाही. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरले पाहिजे. कारण एल निनोचा प्रभाव पाहता पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षी काय परिस्थिती होईल सांगता येत नाही.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये सध्या 97 टक्के म्हणजेच 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
27 सप्टेंबरचा पाणीसाठा
मोडक सागर 85.71 टक्के
तानसा 96.50 टक्के
अप्पर वैतरणा 96.60 टक्के
मध्य वैतरणा 98.72 टक्के
भातसा 98.93 टक्के
विहार 100 टक्के
तुळशी 99.77 टक्के
महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा खात्यातर्फे मुंबईची पाणीकपात रद्द करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे सोमवारी सादर करण्यात येणार आहे. त्यावर चर्चा झाल्यानंतर सकारात्मक निर्णय होईल.




























































