
राज्यातील भीषण दुष्काळ डोळ्यासमोर दिसत असतानाही महायुती सरकार तातडीची पावले उचलत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. दुष्काळाच्या प्रश्नावर विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन तत्काळ बोलवण्यात यावे अशा प्रमुख मागणीसह 17 मागण्या त्यांनी या पत्रात केल्या आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेती, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न बिकट बनला आहे, असे शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. दुष्काळग्रस्तांना दसरा-दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी शरद पवार यांनी या पत्रात केली आहे. कर्जमाफी, वीजबिल माफी, रोजगार, पाणीपुरवठा आणि आर्थिक मदतीपर्यंतच्या पुढील 17 मागण्या त्यांनी पत्रात केल्या आहेत.
पवार यांनी केल्या 17 मागण्या
– दुष्काळाच्या मुद्दय़ावर चर्चेसाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा.
– दुष्काळग्रस्त शेतकऱयांचा संपूर्ण जमीन महसूल माफ करा.
– शेतीसाठी घेतलेली सहकारी, राष्ट्रीयीकृत तसेच अर्बन बँका, पतसंस्थांची कर्जे, फळबाग कर्ज, महिला बचत गटांचे कर्ज तसेच अल्पसंख्याक आणि आदिवासी विभागाशी संबंधित वैयक्तिक कर्जे माफ करा.
– शेतकऱयांच्या कृषी पंपांची थकबाकीसह वीजबिले माफ करा.
– दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, वसतिगृहाचे शुल्क आणि मेसचे शुल्क माफ करा.
– रोजगार हमी योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणून काम मागणाऱया नागरिकांना त्यांच्या परिसरापासून तीन किलोमीटरच्या आत तातडीने रोजगार उपलब्ध करून द्या.
– टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्या.
– कृषी वीजपुरवठा खंडित करू नका.
– प्रत्येक कुटुंबाला 25 किलो मोफत धान्य द्या.
– जनावरांच्या चाऱयासाठी शेतकऱयांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करा.
– जलसंधारणासाठी विशेष निधी द्या.
– दुष्काळबाधित शेतकऱयांना प्रति हेक्टर एक लाख रुपये, तर शेतमजूर कुटुंबांना 25 हजार रुपये थेट आर्थिक मदत द्या.
– फळबाग आणि विविध पिकांसाठी नुकसानभरपाई द्या.
– फळबागांसाठी टँकरने पाणीपुरवठा पाणीपुरवठा करा.
– प्रलंबित वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान द्या
– दुष्काळ निवारणासाठी उपलब्ध असलेला निधी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱयांकडे थेट उपलब्ध करून द्या.
– दुष्काळाच्या परिस्थितीवर विधिमंडळात सविस्तर चर्चा करण्यासाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा.




























































