जगभरात दहशतवाद घटला, पाकिस्तानात मात्र वाढला; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात दहशतवाद घटला, पाकिस्तानात मात्र वाढला आहे. पाकिस्तान प्रथमच जगातील दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसलेला देश ठरला आहे. ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026’ नुसार पाकिस्तानने बुर्किना फासोला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.

‘इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अॅण्ड पीस’च्या अहवालानुसार, 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादाच्या 1,045 घटना घडल्या आणि 1,139 जणांचा मृत्यू झाला. दहशतवादामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास सहा टक्क्यांनी वाढ झाली. पाकिस्तानमध्ये सलग सहाव्या वर्षी दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. याच काळात जगभरातील दहशतवादामुळे होणारे मृत्यू 28 टक्क्यांनी घटून 5,582 झाले, तर दहशतवादी घटनांची संख्या 22 टक्क्यांनी कमी होऊन 2,944 झाली.

दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानात खैबर पख्तुनख्वा प्रांतात भीषण आत्मघाती हल्ला झाला होता, त्यात 11 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारचे आत्मघातील हल्ले पाकिस्तानात वाढले आहेत. यामध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेल्या हल्ल्यांची संख्या जास्त आहे.

टीटीपी घातक दहशतवादी गट

‘इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अॅण्ड पीस’च्या अहवालानुसार, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) हा पाकिस्तानमधील सर्वाधिक घातक दहशतवादी गट ठरला आहे. 2025 मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादाशी संबंधित मृत्यूंपैकी 56 टक्के मृत्यू टीटीपीशी संबंधित होते. या संघटनेने 595 हल्ले केले आणि त्यात 637 जणांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानच्या पश्चिमेकडील भागांमध्ये दहशतवादाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या दोन प्रांतांमध्ये 2025 मधील 74 टक्क्यांहून अधिक दहशतवादी हल्ले झाले, तर देशातील दहशतवादाशी संबंधित 67 टक्के मृत्यू याच भागात नोंदवले गेले.