
ओंकार संकपाळ
जग झपाटय़ाने बदलत आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे युग आहे. बदलत्या तंत्रज्ञानाने माणसाचे अनेक व्यवहार सोपे केले असले, तरी त्याचवेळी नवी आव्हानेही तितक्याच ताकदीने समोर उभी केली आहेत. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम कोणत्याही एका क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो माणसाच्या नातेसंबंधांपर्यंत पोहोचला आहे. आजच्या तरुणाईसमोर ‘लग्न’ हा शब्द उच्चारला की नव्या नात्याची उत्सुकता कमी आणि भविष्याबद्दलची भीती अधिक जाणवते, असे म्हणण्यास वाव आहे. कारण याचा पुरावा आजचा समाजच आहे. याच मुद्दय़ाला हात घालून लेखक रवींद्र पांढरे यांनी ‘घोडमुंजे’ या पुस्तकातून लग्न ही संकल्पना किती भयंकर होत चालली आहे यावर अगदी सोप्या भाषेत प्रकाश टाकला आहे.
काळानुरूप बदलत जाणाऱया समाजव्यवस्थेस धरून लेखकाने गाव- खेडय़ातील भीषण परिस्थिती मांडली आहे. हुंडा प्रथा, शेतकऱयाचा आक्रोश, सरकारी कारभार, संसाराचा गाडा याबाबत केलेली विस्तृत मांडणी सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडणारी आहे. लग्न म्हणजे ‘मोठं आव्हानच गडय़ा’ ही सर्वसामान्य लोकांची भावना झालेली आहे. शहर असो वा ग्रामीण भाग, या बदलाला कोणीही अपवाद नाही. आजच्या पिढीचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वीच्या पिढीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. वाढते घटस्फोटाचे प्रमाण, नात्यांमधील वाढती दरी, करिअरला दिले जाणारे प्राधान्य, आर्थिक स्वावलंबन आणि बदललेल्या अपेक्षा यामुळे विवाहसंस्थेसमोरच नवे प्रश्न उभे राहिले आहेत. त्यात मुलींच्या बदलत चाललेल्या अपेक्षा यामुळे यात अधिकच भर पडते आहे.
‘लग्नाळू मुलगा असूनही लग्न जमत नाही’ ही समस्या आता अनेक कुटुंबांसमोर उभी आहे. विशेषत ग्रामीण भागातील अनेक तरुण वयाची चाळिशी ओलांडली तरी योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे म्हणण्यापेक्षा त्या बदलल्या आहेत, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. एक काळ असा होता की, घरची शेतीवाडी, गुरेढोरे आणि स्थिर उत्पन्न असले की मुलाचे लग्न सहज जुळत असे. ग्रामीण भागातील कुटुंबात सून येणे हा सामाजिक प्रतिष्ठेचा भाग मानला जात असे. मात्र, आता परिस्थिती कमालीची बदलली आहे. शेती, जमीन-जुमला आणि पारंपरिक व्यवसायापेक्षा शिक्षण, नोकरी, नियमित उत्पन्न, शहरातील वास्तव आणि आधुनिक जीवनशैलीला अधिक महत्त्व दिले जात आहे.
ग्रामीण भागातील तरुण अशिक्षित आहेत, असे चित्र दुर्मिळ आहे. अनेक तरुण उच्चशिक्षित आहेत. मात्र, शेती किंवा पारंपरिक व्यवसाय करणाऱया मुलांकडे आजही काही वेळा दुय्यम नजरेने पाहिले जाते. त्याउलट शहरातील ‘व्हाईट कॉलर’ नोकरी करणारे तरुण मुलींना अधिक आकर्षक वाटतात. यामध्ये मुलींचाही दोष म्हणता येणार नाही. बदलत्या जीवनशैलीत आर्थिक स्थैर्य, सुरक्षित भविष्य आणि समान विचारसरणी यांना महत्त्व मिळणे स्वाभाविक आहे. मात्र, या सगळ्या बदलांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न कायम आहे, लग्न नेमके हवे कशासाठी? केवळ सामाजिक परंपरा म्हणून, की दोन व्यक्तींनी एकमेकांच्या सोबतीने आयुष्य घडवण्यासाठी? आज तरुण-तरुणी लग्नाचा निर्णय अधिक विचारपूर्वक घेत आहेत. ‘समाज काय म्हणेल?’ यापेक्षा ‘माझ्यासाठी योग्य काय?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे विवाहाचे वय वाढत आहे, जोडीदार निवडताना निकष बदलत आहेत आणि अनेक जण लग्न करण्यापेक्षा एकटे राहण्यालाही प्राधान्य देत आहेत.
विवाहसंस्था संपत चालली आहे, असे सरसकट म्हणणे कदाचित घाईचे ठरेल. पण, तरुणाई लग्नाबद्दल कसा विचार करते, भीती, आव्हाने, घुसमट, समाजाचा दबाव हे सगळं चित्र ‘घोडमुंजे’ पुस्तकातून अनुभवता येते. पूर्वी कुटुंब आणि समाज ठरवत असलेले लग्न आज व्यक्ती स्वतच्या आयुष्याचा निर्णय म्हणून पाहत आहे. त्यामुळे ‘लग्न जमेना’ हा केवळ मुलगा किंवा मुलीचा प्रश्न राहिलेला नसून बदलत्या समाजव्यवस्थेचे ते एक महत्त्वाचे प्रतिबिंब बनले आहे. कदाचित लग्न इतिहासजमा होणार नाही; पण लग्नाची व्याख्या, त्यामागची कारणे आणि नात्याकडून असलेल्या अपेक्षा मात्र इतिहासात नक्कीच बदलल्या आहेत. हा बदल समजून घेणे हीच आजच्या समाजासमोरील खरी गरज आहे.
लग्नसंस्था हा समाजव्यवस्थेचा अविभाज्य भाग असताना सध्याच्या काळात मात्र या संकल्पनेविषयी तरुणांच्या मनात संभ्रम वाढत चालला आहे. त्यातच ‘मॉडर्न लाईफस्टाईल’ला प्राधान्य देणाऱया समाजामुळे ग्रामीण भागातील विशेषतः शेतकऱयांच्या मुलाला भविष्याविषयीची स्वाभाविक काळजी आहे हे तितकेच खरे.
घोडमुंजे
लेखक : रवींद्र पांढरे
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठे : 120
मूल्य : रु. 225/-



























































