Ratnagiri News – गणेशमुर्तीवर सोड्याची बॉटल फेकली, आरोपीला पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विसर्जन दरम्यान गणेश मुर्तीवर सोड्याची बॉटल फेकणाऱ्या वृद्धाला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी रात्री 9 वा.सुमारास शहरातील झारणी रोड परिसरात ही घटना घडली. शमशूद्दीन अब्दुल मुजावर (70) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. आरोपीविरोधात सागर चक्रधर दळवी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दळवी हे शुक्रवारी रात्री त्‍यांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मिरवणूक घेउन जात होते. यादरम्यान संशयिताने झारणी रोड येथील जामा मस्जिद समोरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन त्‍याच्याकडील दारुचा वास येत असलेली आणि मांसाहारी पदार्थ लावलेली सोडा बॉटल मिरवणुकीमध्ये गणपतीच्या मुर्तीवर फेकून मारली. त्‍यानंतर फिर्यादी व त्‍यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना हातवारे करुन चिथावणी देउन त्‍यांच्यावर हसून त्‍यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्‍न केला.

याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी संशयिताला तातडीने अटक केली. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 19(2), 299, 300 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले होते.