
रत्नागिरी विमानतळावरील नाईट लॅण्डिॅगसाठी आवश्यक जागेचा प्रश्न अद्याप न सुटल्यामुळे विमानतळावरून होणारी खासगी वाहतूक सेवा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांचे उड्डाणाचे स्वप्न हवेतच राहिले आहे.
रत्नागिरी विमानतळ सुरू होणार यांची चर्चा गेली अनेक वर्षे सुरु आहे. जुलै महिन्यात रत्नागिरीतील अलिशान हॉटेलमध्ये रत्नागिरी विमानतळाचा सामंजस्य करण्यात आला होता. यावेळी जाहिरातबाजी करून मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढील तीन महिन्यात रत्नागिरीतून विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा केली होती. त्यामुळे दिवाळीत रत्नागिरीतून विमानसेवा सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र अत्यावश्यक जमिनीचा प्रश्न न सुटल्याने विमानतळावरील वाहतूक रखडली आहे.
रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. तटरक्षक दलाची सेवा सुरू झाली आहे. खासगी सेवा सुरू होण्यास विलंब लागला आहे. खासगी विमानांसाठी नाईट लॅण्डिंगची सेवा आवश्यक आहे. त्याकरिता जी जमिन निवडली होती तिथे काही घरे आहेत त्यामुळे ती जागा अडचणीची ठरली आहे. आता पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. दिवसाची विमान वाहतूक सुरू करण्यास किंवा लहान विमाने उतरण्यासाठी विमानतळ सज्ज आहे. मात्र मोठ्या आसन क्षमतेच्या विमान वाहतुकीसाठी नाईट लॅण्डिगची सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना हवाई यात्रेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.





























































