
समृद्धी महामार्गावरील डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चॅनेल क्रमांक २६९ वर ट्रक चालक व क्लिनरला मारहाण करून ट्रकसह त्यातील कांदा जबरीने घेऊन जाण्याचा प्रकार २५ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मलकापूर मध्यवर्ती पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तत्परतेने कारवाई करीत ट्रक, स्कोडा कार आणि चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कोडा कारमधून आलेल्या चार व्यक्तींनी समृद्धी महामार्गावर ट्रक अडवून चालक व क्लिनरला मारहाण केली आणि ट्रक व त्यातील कांदा जबरीने घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मलकापूर मध्यवर्ती पोलीस केंद्रातील रात्रपाळीवरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक चालकांकडून घटनेची माहिती घेतली.
दरम्यान, ट्रक क्रमांक CG 04 PP 9113 याची तांत्रिक मदतीच्या सहाय्याने माहिती घेऊन पोलिसांनी तत्काळ अमानी टॅपचे पीएसआय प्रकाश सरनाईक यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नमूद ट्रक, स्कोडा कार तसेच चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक, नागपूर रेंज लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाई पथकात एपीआय राहुल पाटील, पीएसआय प्रकाश सरनाईक, एएसआय मंगेश खडसे, एचसी आशिष राऊत, पीसी रामप्रसाद डोळे, पीसी नासिर शेख, रोशन शेख, हरिओम काकडे तसेच महामार्ग सुरक्षा पथक, बुलढाणा यांचा समावेश आहे.






























































