
कल्याण-डोंबिवली परिसरातील। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन निवेदन दिले. शास्त्रीनगर रुग्णालय तसेच चोळेगाव आणि विविध डायलिसिस सेंटरमध्ये आवश्यक डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
केडीएमसीतील शिवसेना गटनेते उमेश बोरगावकर, माजी नगरसेवक तात्यासाहेब माने, डोंबिवली पूर्व शहर महिला संघटक अक्षरा पटेल, शाखा संघटक दामिनी पाटकर, श्रद्धा नाईक, उपशाखा संघटक मोहिनी गावडे, उपविभाग संघटक रोहिदास चव्हाण यांनी उपायुक्त प्रसाद बोरकर यांची भेट घेऊन शास्त्रीनगर रुग्णालयासह चोळेगाव आणि अन्य डायलिसिस सेंटरमध्ये आवश्यक डॉक्टर व वैद्यकीय मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. डायलिसिस ही रुग्णांसाठी जीवनावश्यक वैद्यकीय सेवा आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या कमतरतेमुळे सेंटर बंद राहणे किंवा रुग्णांना उपचारांसाठी अडचणींचा सामना करावा लागणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. बंद असलेली सेंटर त्वरित सुरू करावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
अत्याचार प्रकरणाचा निष्पक्ष तपास करा !
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्यावर एका पीडित महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या अत्याचार प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निष्पक्षपणे करण्यात यावा, तसेच तपासात दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेऊन केली. तसेच नवरात्रोत्सवात महिला सुरक्षेसाठी विशेष पोलीस बंदोबस्ताची मागणीही करण्यात आली.































































