Video – सिक्कीममध्ये नेपाळची पुनरावृत्ती… मुसळधार पावसानंतर भूस्खलन; अनेक घरं वाहून गेली, मुख्यमंत्री म्हणाले, परिस्थिती गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या भीषण आपत्तीची पुनरावृत्ती आता सिक्कीममध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सिक्कीममधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या भीषण घटना घडल्या आहेत. पश्चिम सिक्कीमच्या युक्सोम-ताशीडिंग मतदारसंघातील रिम्बी गावात गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे निसर्गाने रौद्ररूप धारण केले. डोंगरावरून आलेल्या प्रचंड चिखल, पाणी आणि भल्यामोठ्या खडकांच्या ढिगाऱ्याने संपूर्ण गावाला कवेत घेतले.

या भीषण भूस्खलनामध्ये रिम्बी गावातील अनेक घरे आणि मालमत्ता चिखलाच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे ३० हून अधिक घरांचे अतोनात नुकसान झाले असून यात वीज विभागाच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत अत्यंत धोकादायक स्थितीत अडकलेल्या २८ कुटुंबांतील १२८ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

केवळ रिम्बीच नव्हे, तर सिक्कीमची राजधानी गंगटोक, तादोंग आणि लिंगडिंग भागातही मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी मुख्य रस्ते खचले असून पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाइपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. लिंगडिंग झोराजवळील रस्ता कित्येक तास पूर्णपणे बंद पडल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. याशिवाय सिचे येथील सीवेज ट्रीटमेंट प्लांटसह सरकारी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून संपर्क यंत्रणा कोलमडली आहे.

राज्यातील या भयानक परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, असे स्पष्ट केले आहे. प्रशासकीय यंत्रणेला २४ तास अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले असून बाधित भागांत तातडीने मदत सामग्री पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक आमदार आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी बाधित क्षेत्रांची पाहणी केली असून, डोंगराचा भाग आणखी खचू नये यासाठी संवेदनशील टेकड्यांवर तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री (तिरपाल) बिछावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हवामान विभागाने सिक्कीममध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भूस्खलन प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात अनावश्यक प्रवास टाळावा आणि रात्रीच्या वेळी दरडी कोसळण्याची शक्यता जास्त असल्याने विशेष सतर्कता बाळगावी, अशा कडक सूचना प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत.