
शेतात पिके तयार होत असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने भीषण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊन दिलासा दिला जाईल. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांसोबत असून त्यांनी कोणतीही चिंता करू नये, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुष्काळग्रस्तांना दिले. दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर एक नुसार देण्यात येणाऱया मदतीचा आदेश उद्याच (शुक्रवार) काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा केला. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पेंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच केंद्राच्या मदतीसाठी आवश्यक असणारे पंचनामे आदी प्रक्रिया करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
येत्या काळात चारा, पाणीटंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी थेट मदत करण्यात येईल. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके घेण्याबाबत तपासणी करण्यात येईल. तसेच रब्बी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. याशिवाय रोजगार उपलब्ध होण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यामुळे यातील गाळ काढणे, जलतारा स्ट्रक्चर निर्माण करणे, दुरुस्ती करणे आवश्यक असलेले तलाव शोधून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
बँकांना कर्ज द्यावेच लागेल
सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारने मदतीचे धोरण आखले आहे. सरकारने कृषी कर्जमाफी केली असून कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे बँकांना कर्ज द्यावेच लागेल. त्यासोबतच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
































































