राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी आर.सी. पटेल हायस्पूलच्या 10 विद्यार्थ्यांची निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द बोरिवली एज्युकेशन सोसायटीच्या आर.सी. पटेल हायस्पूल, बोरीवली (पूर्व) या शाळेने क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. शाळेतील तब्बल 10 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 साठी निवड झाली आहे. शाळेच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांनी थ्रोबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.

या विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि उत्पृष्ट सांघिक कामगिरीमुळे त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बंगाल थ्रोबॉल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या विभागातून आदर्श जयस्वाल, निहाल भावसार, भव्य चौबे, ऋषभ यादव, दीपक सोंगर आणि दिलीप यादव यांचा समावेश आहे. तर मुलींच्या विभागातून संस्कृती केंबळे, निधी गुप्ता, अलाश्का झा आणि अनन्या गुप्ता यांची निवड झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका भक्ती आशिष वशी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची मेहनत, शिस्त, सांघिक भावना आणि जिद्दीचे त्यांनी कौतुक करत त्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना शाळेतील सहाय्यक शिक्षक (शारीरिक शिक्षण) राजेश शिगवण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अध्यक्ष जयेशभाई याग्निक, उपाध्यक्ष माधव जयेश वालिया, तसेच द बोरिवली एज्युकेशन सोसायटीच्या संपूर्ण व्यवस्थापन समितीचे शाळेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन आणि मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल हिरल माधव वालिया यांचेही विशेष आभार मानण्यात आले.