
दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांनी मंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मंत्र्यांना आता थेट शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागत आहे. बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे गुरुवारी पीक पाहणीसाठी आलेल्या मंत्र्यांच्या वाहनांचा ताफाच संतप्त शेतकऱ्यांनी अडविला.
पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन वानखेडे आणि राजू तोडसाम यांनी बाभूळगाव तालुक्यातील गवंडी, सारफळ तसेच घारफळ येथे पीक परिस्थितीची पाहणी केली. पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पिकांना निर्णायक टप्प्यावर पाण्याची गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
पिके उध्वस्त; वीजही मिळेना!
पावसाअभावी पिके हातातून जाण्याची वेळ आली असताना सिंचनाची सुविधा उपलब्ध असूनही पुरेसा आणि अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शेतात पाण्याची सोय आहे; मात्र वीज नसल्याने त्या पाण्याचा उपयोग करता येत नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मंत्र्यांसमोर मांडली.
पावसाचा खंड आणि वीजपुरवठ्याची समस्या या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांचा संतापाचा बांध फुटला. घारफळ येथे मंत्र्यांचा ताफा येताच शेतकऱ्यांनी रस्त्यावर येत वाहने अडविली. पिकांचे नुकसान, पावसाची ओढ आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांसमोर आपला आक्रोश व्यक्त केला.
पोलिसांनी शेतकऱ्यांना बाजूला केले
मंत्र्यांचा ताफा अडविल्यानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना रस्त्याच्या बाजूला केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा असताना पोलिसांनी आपल्याला बाजूला केल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली असली, तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जाण्याची वेळ मंत्र्यांवर आली आहे. आता या पाहणीनंतर पिकांचे नुकसान, दुष्काळी मदत आणि अखंडित वीजपुरवठ्याबाबत शासन कोणते ठोस निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



























































