
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य रेल्वेची मेन आणि हार्बर लाईन तसेच पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत विशेष लोकल धावणार आहेत. तसेच भुयारी मेट्रोसह मेट्रोच्या इतर मार्गिकांवर उशिरापर्यंत ट्रेनची सेवा सुरू राहणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर 18, हार्बरवर 4 आणि पश्चिम रेल्वेवर 12 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
गणपतीला निरोप देण्यासाठी गणेशभक्त लालबाग, परळसह गिरगाव चौपाटी परिसरात गर्दी करतात. त्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी शुक्रवारी रात्री मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याणदरम्यान 18 विशेष लोकल धावणार आहेत. शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत या गाडय़ा प्रवासी सेवेत असतील. हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परतीच्या प्रवासासाठी 4 विशेष लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवर रात्रभर 12 विशेष लोकल गाडय़ा गणेशभक्तांच्या सेवेत धावणार आहेत.
भुयारी मेट्रोची रात्रभर सेवा
आरे जेव्हीएलआर ते कफ परेडदरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गिकेवर शुक्रवारी संपूर्ण रात्रभर प्रवासी सेवा सुरू राहणार आहे.





























































