ज्ञानेश कुमार गुन्हा कबूल करा, माफीचे साक्षीदार व्हा! मतचोरीचे मोदी-शहाच मुख्य सूत्रधार…, राहुल गांधींनी केली निवडणूक घोटाळ्याची चिरफाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगातील अंतर्गत बंडातून ‘मत’चोरीचा पर्दाफाश झाल्यानंतर आक्रमक झालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तुफानी हल्ला चढवला. ‘‘ज्ञानेश कुमार यांनीही आता गुन्हा कबूल करावा आणि राजीनामा देऊन माफीचे साक्षीदार व्हावे, तेच देशाच्या हिताचे आहे,’’ असे राहुल गांधी यांनी सुनावले. ‘‘ही साधीसुधी चोरी नसून सुनियोजित कटकारस्थान आहे. देशाविरुद्धचा द्रोह आहे. मोदी आणि शहा हे या कटाचे मुख्य सूत्रधार आहेत. जे व्हायचे ते होवो, या गुह्यासाठी त्यांची चौकशी होणारच हा शब्द मी देशाला देतो,’’ असा जोरदार इशारा राहुल यांनी दिला.

मोदी-शहा आणि त्यांचे लोक मतचोरी करत, लोकशाही उद्ध्वस्त करत राहतील आणि विरोधी पक्ष शांत राहील असं होणार नाही. आमचा पक्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलाय. आम्ही नाही गप्प बसणार!

निवडणूक आयोगातील बंडाळी चव्हाटय़ावर आल्यानंतर राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी देशात होत असलेल्या निवडणूक घोटाळय़ांची चिरफाड केली. भाजप व मोदी-शहांच्या कार्यपद्धतीवरही जोरदार टीका केली. ‘‘मतचोरी करून या लोकांनी देशाची लोकशाही चौकटच उद्ध्वस्त करून टाकली आहे. संविधानाने दिलेल्या मताधिकारावर डल्ला मारणारे हे देशद्रोहीच आहेत. ज्ञानेश कुमार यांनी जे केले, ते देशविरोधी कृत्य आहे. ही क्षुल्लक हेराफेरी नसून देशाच्या संविधानावरच हल्ला आहे,’’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ‘‘देशाच्या इतिहासात  लोकशाहीवर असा हल्ला कधीच झालेला नाही. पुढच्या तीन-चार महिन्यांत हळूहळू सगळे बाहेर येईल. आमच्याकडे सगळी माहिती आहे. गेल्या काही वर्षांतील निवडणुका बोगस होत्या हेही समोर येईल,’ असे राहुल गांधी म्हणाले. ‘मतचोरी होत आहे आणि ती थांबली पाहिजे असे भाजपमधले काही लोकसुद्धा मानतात,’ असा दावाही त्यांनी केला.

‘ते’ सात कटकारस्थानी कोण?

देशातील लोकशाही उद्ध्वस्त करण्याच्या कारस्थानात सात लोकांची प्रमुख भूमिका आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बॅनरच झळकावले. त्यावर पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उद्योगपती गौतम अदानी, ज्ञानेश कुमार आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांचे फोटो होते. तर निर्मला सीतारामन, बाबा रामदेव, जय शहा, पंगना राणावत, धर्मेंद्र प्रधान, अर्णव गोस्वामी, विवेक अग्निहोत्री, पियूष गोयल, बृजभूषण सिंह, रजत शर्मांसह 12 जणांना त्यांचे प्यादे म्हणून दाखवण्यात आले.

‘ईव्हीएम आणि एसआयआर या दोन मार्गांनी मतचोरी होत आहे. त्यामुळे लोकांचाही विश्वास उडत चालला आहे. हा विश्वास पुन्हा मिळवणे गरजेचे आहे. मात्र खुद्द निवडणूक आयोगाचेच मतदारयादीवर नियंत्रण राहिलेले नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

ज्ञानेश कुमारांविरोधात हायकोर्टात याचिका

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेले सर्व निर्णय रद्द करा आणि एसआयआर प्रक्रिया थांबवा, अशी मागणी करणारी पहिली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठापुढे दाखल करण्यात आली आहे.

सत्ताविरोधी लाट का गायब झाली?

‘देशात असा कोणताही पंतप्रधान नाही ज्याला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला नाही. बांगलादेश युद्धानंतर कमालीच्या लोकप्रिय झालेल्या इंदिरा गांधी यांनाही त्याचा सामना करावा लागला. वाजपेयींसह इतर नेतेही त्यातून सुटले नाहीत. मात्र 2014नंतर ही लाटच गायब झाली आहे. मोदी-शहांना सत्ताविरोधी लाटेचा सामनाच करावा लागत नाही. एकामागोमाग एक निवडणूक ते जिंकत आहेत. हे कसे? त्याचे उत्तर दोन निवडणूक आयुक्तांनी दिले आहे, असे राहुल म्हणाले.

मतचोरीतून आलेल्या सरकारचे कायदे बेकायदा

आधी मत चोरी, नंतर कायदा चोरी आणि त्यानंतर घटनात्मक संस्थांची चोरी अशी ही साखळी आहे. भाजपने तेच केले आहे. मतचोरीतून निवडून आलेल्या या सरकारने अनेक कायदे केले आहेत. संस्थात्मक बदल केले आहेत. हे सगळे कायदे आणि बदल बेकायदा आहेत, असे राहुल म्हणाले.

विरोधक महाभियोग प्रस्ताव आणणार

निवडणूक आयोगातील दोन सहकारी आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांचे आक्षेप डावलून मनमानीपणे निर्णय घेणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुरते गोत्यात आले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच त्यांच्याविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांत महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारीही विरोधी पक्षांनी केली आहे. त्यासाठी कायदेतज्ञांच्या सल्ल्याने महाभियोगाच्या प्रस्तावाचा मसुदा तयार केला जात असून, लवकरच दोन्ही सभागृहांना याबाबतची नोटीस दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.