मीठ, साखर आणि फॅटच्या प्रमाणावरून ठरणार जंक फुड; शाळेच्या 50 मीटर परिसरातील बंदीबाबत नियम होणार कठोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात शाळा आणि शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फुड विकण्यास मनाई आहे. मात्र त्याबाबत बरीच अस्पष्टता होती. त्यामुळे खाद्य सुरक्षा विभागाने (एफएसएसएआय) नव्या नियमांचा मसूदा जारी केला आहे. त्यानुसार पॅकबंद खाद्यपदार्थांमधील मीठ, साखर आणि फॅटच्या प्रमाणावरून तो पदार्थ विक्री करण्यालायक आहे की नाही, हे ठरणार आहे.

देशभरात शाळांमध्ये आणि शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फुड विकण्यास वर्ष 2020 पासून बंदी आहे. मात्र या नियमांतर्गत कोणत्या पदार्थांना सामील करावे याबाबत सहा वर्षांनीदेखील स्पष्टता नव्हती. त्यामुळे आता खाद्य सुरक्षा विभागाने अधिक स्पष्टता आणण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा जारी केला आहे. एखादा पदार्थ जंक फुड किंवा खाण्यायोग्य आहे की नाही हे त्यातील मीठ, साखर आणि फॅटच्या प्रमाणावर ठरणार आहे. यांचे किती प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक आहे, हे नव्या नियमांमधून स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारांवर राहणार आहे. सध्या चिप्स, बिस्कीट, खारे पदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर थेट बंदी नाही. मात्र शाळेतील कॅण्टीन, मेस, वसतिगृह आणि शाळेच्या 50 मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री आणि मुलांना आकर्षित करणाऱ्या जाहिरातींना बंदी आहे.

पेय पदार्थदेखील तपासाच्या कक्षेत

केवळ स्नॅक्स किंवा चिप्स, बिस्कीट हेच पदार्थ नव्या नियमांच्या कक्षेत येणार नसून पेयपदार्थांचीदेखील तपासणी करण्यात येईल. नारळपाणी, ताक, फळांचा रस, लस्सी, चहा, कॉफीदेखील तपासण्यात येतील. त्यात न्यूट्रीशनचे प्रमाण किती आहे, हे तपासले जाईल.

जंक फुडची यादी किंवा हेल्दी मेन्यू निश्चित नाही

खाद्य सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले की, सध्या शाळांसाठी अनिवार्य भोजनाची यादी किंवा आरोग्यदायी पदार्थांची यादी तयार करण्यात आलेली नाही. न्यूट्रीशनचे प्रमाण निश्चित करणाऱ्या मसुद्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतरच शाळांच्या 50 मीटर परिसरात कोणत्या पदार्थांवर बंदी घातली जाईल, हे स्पष्ट होणार आहे. याबाबत शाळेच्या कर्मचाऱ्यांनादेखील प्रशिक्षण देण्यात येईल.