ज्ञानेश कुमार सर्वात मोठे गद्दार; 48 तासांत राजीनामा दिला नाही तर देशभर आंदोलन, कॉक्रोचचा अल्टिमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक चोरीच्या कथित कटकारस्थानातील सूत्रधार असलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने आघाडी उघडली आहे. ‘ज्ञानेश कुमार हे देशाचे सर्वात मोठे गद्दार आहेत. त्यांनी 48 तासांत राजीनामा दिला नाही तर देशव्यापी आंदोलन पुकारले जाईल,’ असा अल्टीमेटम सीजेपीचे संयोजक अभिजित दीपके यांनी आज दिला.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत दीपके यांनी ज्ञानेश कुमारांवर हल्ला चढवला ‘ज्ञानेश कुमार हे लोकशाही पुढचा सर्वात मोठा धोका आहेत. ते निवडणूक आयुक्त झाल्यापासून मतदान कोणी करायचे आणि कोणी करायचे नाही हे सरकार ठरवत आहे. ही कुठली लोकशाही आहे? ज्ञानेश कुमारांनी लोकशाही उद्ध्वस्त करून टाकली आहे’, असा आरोप दीपके यांनी केला. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा. 48 तासांत ते पायउतार झाले नाहीत तर आम्ही देशव्यापी आंदोलन करू. त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असेही दीपके यांनी ठणकावले.

सीजेपीच्या मागण्या

  • ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हेगारी खटला चालवा
  • ज्ञानेश कुमार यांना आदेश कोणी दिले हे देशाला सांगा
  • आगामी सर्व निवडणुका स्थगित करा
  • एसआयआर प्रक्रिया रद्द करून जानेवारी 2025ची मतदार यादी पुन्हा लागू करा
  • स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करून एसआयआरसंबंधी सर्व निर्णयांचा आढावा घ्या
  • एसआयआरच्या निर्णयाच्या सर्व फाइल्स सुप्रीम कोर्टाने स्वतःच्या ताब्यात घ्याव्यात. तसे आदेश काढावेत
  • निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंबंधीचा 2023 चा कायदा पुनर्स्थापित करा आणि निवड समितीवर सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांना स्थान द्या.

प्रश्न आयोगाला, उत्तर भाजप देतो!

‘मतचोरीबद्दल निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की भाजपचे प्रवत्ते संबित पात्रा उत्तर देतात. हे देशात काय चालले आहे? एकतर संबित पात्रा यांनी निवडणूक आयोगावर बसावे किंवा ज्ञानेश कुमार यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा,’ असा टोला दीपके यांनी हाणला.