
दहा वर्षांपूर्वी कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केली. या घटनेने महाराष्ट्र हादरला. ही घटना जेथे घडली त्या घटनास्थळाची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पाहणी करणार आहेत. या प्रकरणी साक्षीदारांनी दिलेली साक्ष व सरकारी पक्षाचे पुरावे याचा आढावा घेतला जाणार आहे.
यातील आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना विशेष न्यायालयाने 2017 मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली. शिंदेने पुणे मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या तिन्ही आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले तर या आरोपीच्या फाशीवर शिक्कामोर्तब व्हावे यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र याचिका केली आहे.
न्या. भारती डांगरे व न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे. संबंधित घटनास्थळी हजर असलेल्या साक्षीदारांची साक्ष व त्याआधारे सादर झालेले पुरावे विशेष न्यायालयाने निसंदेह ठरवले आहेत. याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी घटनास्थळाची पाहणी करायची आहे. या पाहणीवर कोणीही आक्षेप घेतला नसल्याने 2 ऑक्टोबरला या घटनास्थळाची पाहणी केली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
स्पष्टता येणे आवश्यक
या घटनास्थळी आरोपींचा सुरू असलेला वावर साक्षीदारांनी बघितला होता. या साक्षीबद्दल आम्ही सरकारी पक्षाला प्रश्न विचारले होते, पण समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. यात अधिक स्पष्टता यावी यासाठी आम्ही घटनास्थळाची पाहणी करणार आहोत, असे न्यायालयाने नमूद केले.





























































