साताऱ्यात ढोल—ताशांचा गजर… ‘मंगलमूर्ती मोरया…’चा जयघोष, दिमाखदार विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आमच्या जीवाला’ अशा सद्गदित भावनेने साताऱ्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आज मिरवणुका काढून लाडक्या गणरायाला निरोप दिला. वाद्यांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात निघालेल्या विसर्जन मिरवणुकांमध्ये पारंपरिक पोशाखात गणेशभक्त उत्साहाने सहभागी झाले होते. आज सातारा शहर व परिसरातील 53, तर संपूर्ण जिल्ह्यात 751 सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. साताऱ्यात ढोल-ताशांचा गजर… ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष सुरू होता.

शेटे चौकातील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाश मंडळाच्या शंकर-पार्वती-गणेशाची सातारचे माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते आरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावर्षी मंडळाने साकारलेल्या देखाव्यातील भव्य प्रतिमा ट्रक्टरवर सजवण्यात आली होती. त्यापुढे शंकर-पार्वती-गणेशाची मूर्ती फुलांच्या सजावटीत ठेवण्यात आली होती. रंगावली रांगोळी कलाकारांनी चौकाचौकात काढलेल्या रांगोळ्या विशेष लक्षवेधक ठरत होत्या.

त्यानंतर शहरातील मंडईचा राजा मंडळाची निघालेली मिरवणूकही भव्यदिव्य अशी होती. ढोल व ताशा पथकाच्या कलाकारांनी केलेले ढोल-ताशांचे वादन लक्ष वेधून घेणारे होते. गुरुवार पेठ येथील सिद्धिविनायक गणेश मंडळाने मिरवणुकीत केलेली फुलांची आरास विशेष लक्षवेधक होती. भगवान विष्णूच्या हातातील शंख, चक्र यांचे दर्शन या
फुलांच्या सजावटीतून कलाकारांनी रेखाटले होते.

माची पेठेतील बाल स्फूर्ती मंडळ, यादोगोपाळ पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळ, केसरकर पेठेतील मयूर सोशल क्लब, क्रांती मंडळ, करंजाचा राजा, पोवई नाका परिसरातील लोणार गल्लीतील श्री गणेशोत्सव मंडळ, मल्हार पेठेतील गोल्डन मंडळ यांसह प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणेशाचीही मिरवणूक निघाली. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या बाल हनुमान गणेश मंडळाची मिरवणूकही पोलिसांनी साध्या वेशात अगदी धोतर, शर्ट, डोक्यावर टोपी घालून मोरयाच्या जयघोषात काढली.

अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मुख्य विसर्जन तळ्यात सातारा येथे 53 गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले, तर संपूर्ण जिल्ह्यात 751 सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीनिमित्त मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असून, या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी व सुरक्षिततेसाठी पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान मोठया प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत.

आज मानाच्या गणपतींची मिरवणूक

n शुक्रवारी (दि. 25) अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी मानाचा सम्राट महागणपती पंचमुखी मंडळ तसेच मोती चौकातील प्रतापसिंह गणेश मंडळाची मिरवणूक सुरू होईल. अनंत चतुर्दशीला सायंकाळी पाच वाजता राजवाडा येथून सातारा नगरपालिकेच्या मध्यवर्ती गणेश मंडळाच्या मूर्तीचे आरती व पूजन होऊन मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल. यानिमित्त विविध ठिकाणी विसर्जन हौद तसेच विसर्जन तळी उभारण्यात आली असून, विसर्जनासाठी महाकाय क्रेन सज्ज ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी डीजे तसेच लेझर लाईटला बंदी घातली असून, रात्री बारापर्यंत मिरवणुकांना वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे.