
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने आणखी एक सुवर्णपदक जिंकले आहे. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुरूची सिंह आणि कमलजीत यांनी शानदार कामगिरी करत आशियाई विक्रमासह हिंदुस्थानला सुवर्णपदक मिळवून दिले. या विजयासह 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील हिंदुस्थानच्या सुवर्णपदकांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले होते.
सुरूची आणि कमलजीत यांची या स्पर्धेसाठी अखेरच्या क्षणी जोडी करण्यात आली होती. मात्र, या संधीचे दोन्ही खेळाडूंनी सोने केले. अंतिम फेरीत या जोडीने 484.6 गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. दक्षिण कोरियाच्या चू गाएउन आणि होंग सुह्योन या जोडीने रौप्य, तर इराणच्या जोडीने कांस्यपदक मिळवले. हिंदुस्थानी जोडीने पात्रता फेरीतही अव्वल स्थान मिळवले होते.
विशेष म्हणजे, या दोन्ही नेमबाजांना त्यांच्या वैयक्तिक प्रकारात अपेक्षित यश मिळाले नव्हते. सुरूचीला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नव्हते. तर कमलजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये नवव्या स्थानावर राहिला होता. त्यामुळे मिश्र सांघिक प्रकारातील हे सुवर्णपदक दोघांसाठीही महत्त्वाचे ठरले.
दरम्यान, 50 मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात हिंदुस्थानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि नीरज कुमार यांच्या हिंदुस्थानी संघाने गुडघ्यावर आणि झोपून नेमबाजीच्या टप्प्यात चांगली आघाडी घेतली होती. मात्र, अंतिम ‘स्टँडिंग’ टप्प्यात गुणांमध्ये घसरण झाल्याने चीनने बाजी मारली. चीनने 1,766 गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
तोमर आणि नीरज कुमार यांना आता वैयक्तिक 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत पदक जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे नेमबाजीमध्ये हिंदुस्थानच्या पदकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.





























































