
१२ दिवस भक्तांचा पाहुणचार घेणाऱ्या लाडक्या बाप्पाचे उद्या विसर्जन होणार आहे. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला वाजतगाजत निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू असून विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्यात याकरिता खाकी वर्दीतील ‘विघ्नहर्ता’ डोळ्यांत तेल घालून रस्त्यावर खडा पहारा देणार आहेत. ठाणे, रायगड, पालघर जिल्हा तसेच नवी मुंबई शहरात तब्बल ८ हजार २८१ पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विसर्जनाच्या दिवशी सुमारे ४ हजार ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने महिला पोलिसांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. रायगडमध्ये पोलीस उपअधीक्षक ७, पोलीस निरीक्षक २९, सहाय्यक व उपपोलीस निरीक्षक १२८, पोलीस अंमलदार १ हजार ९००, याव्यतिरिक्त ५०० होमगार्ड, एसआरपीएफची १ तुकडी तैनात करण्यात आली आहे. तर पालघरमध्ये ७३ पोलीस अधिकारी, ५८४ पोलीस अंमलदार, ५०० होमगार्ड, ६० वाहतूक अंमलदार, ८ स्ट्रायकिंग फोर्स, ३ दंगल नियंत्रण पथके तसेच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
नवी मुंबईत ड्रोनचा वॉच
नवी मुंबईत गणेश विजर्सन शांततेत पार पडावे यासाठी सुमारे चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीला दंगल विरोधी पथक आणि घातपात विरोधी पथक तैनात ठेवण्यात आले आहे. शहरात सुमारे दहा ठिकाणी गणेश विसर्जनावर ड्रोन कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवरही पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी शांततेत आणि वेळेत गणेश विसर्जन पार पाडण्याचे आवाहन नवी मुंबईकरांना केले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३३ पारंपरिक विसर्जन स्थळांवर आणि १५६ कृत्रिम तलावांमध्ये गणरायाचे विसर्जन होणार आहे. महापालिका प्रशासनाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जनाची जोरदार तयारी केली आहे.
ठाण्यात ७९६ सार्वजनिक, ४० हजार घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन
ठाणे, कल्याण, बदलापूर आणि भिवंडी परिसरात यंदा १ हजार ७६ सार्वजनिक आणि १ लाख ६५ हजार ४४८ घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यापैकी ७९६ सार्वजनिक आणि ४० हजार २६७ घरगुती गणेशमूर्तीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होणार आहे. गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १९३ विसर्जन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये कळवा येथील खारेगाव रेतीबंदर, मासुंदा तलाव, उपवन, कोलशेत खाडी, नदी नाका, क्हाळदेवी घाट, काल्हेर खाडी, दुर्गाडी गणेश घाट, मोठागाव रेतीबंदर आणि उल्हास नदी परिसरातील घाटांचा समावेश आहे.
अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलिसांकडून सुरक्षाव्यवस्था पूर्णपणे मजबूत करण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुका आणि विसर्जन घाटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
विसर्जन घाटांवर विशेष सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. तसेच वाहतूककोंडी टाळण्यासाठी अनेक मार्गांवर बदल करण्यात आले आहेत.
पालघरमधील मुख्य चौपाट्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर पोलिसांची गस्त असणार आहे. सुरक्षेसाठी पोलिसांसोबतच स्थानिक कोळी बांधव आणि जीवरक्षक तैनात राहणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन यांसारख्या किनारपट्टीच्या भागांत आणि अंतर्गत रस्त्यांवर पोलिसांचे गस्ती पथक तैनात आहे.
विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक आणि गणेशभक्त मिरवणुकांमध्ये सहभागी होणार असल्याने विसर्जन घाट, मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
चोरीच्या घटना तसेच महिल ांसोबत गैरवर्तनाच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. महिला पोलिसांचे पथकही गर्दीच्या ठिकाणी गस्त घालणार आहे.






























































