
भिवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याबरोबर फरार असलेला पोलीस कर्मचारी शैलेश पाटील याच्याविरोधात त्याची जन्मदात्री आईनेच आवाज उठवला आहे. माझ्या नराधम मुलाला फासावर लटकवा.. त्याने आपल्याला खूप मनस्ताप दिला आहे, असा संतापच आरोपी शैलेश पाटील याची आई सुलोचना पाटील यांनी व्यक्त केला आहे.
१७ सप्टेंबर रोजी पडघा पोलीस ठाण्यात माजी आमदार नरेंद्र
पवार व बडतर्फ पोलीस शैलेश पाटील यांच्यावर एका पीडित महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच गेल्या सात ते आठ दिवसांपासून नरेंद्र पवार व शैलेश पाटील फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी सात पथके रवाना केली आहेत. मात्र अद्यापि त्यांचा शोध लागलेला नाही. अशातच शैलेश पाटील याच्या आईने आज प्रसारमाध्यमांसमोर येत आपल्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली आहे.
सुलोचना पाटील यांचं नेमकं म्हणणं काय?
सुलोचना पाटील यांनी आपला मुलगा शैलेश पाटील याने आपल्याला मोठा त्रास दिल्याचा दावा केला आहे. माझी मालमत्ता बळकावतानाच त्याने कोट्यवधी रुपये हडप केल्याचाही आरोप सुलोचना पाटील यांनी केला आहे. शैलेशच्या या वर्तनामुळे आपण बेघर झालो असून सध्या मुलीच्या घरी आश्रयाला असल्याचे त्यांनी सांगितले.






























































