
केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद समोर आल्यापासून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रमुख विरोधी पक्षांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. सत्तेतले रेडे या ज्ञानेशकुमारांकडून आपले वेद वदवतायत, अशी टीका करत राज ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीची संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे.
एसआयआर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी या प्रक्रियेत नेमके काय घोळ झाले, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. देशातील सर्व विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापुढील सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रितपणे मोठे आंदोलन उभे करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
काय आहे पोस्ट?
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो ,
गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे…— Raj Thackeray (@RajThackeray) September 25, 2026
एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा. तसेच, यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे!






























































