एका पंतप्रधानांनी तरुणांना मतदानाचा अधिकार दिला, तर दुसरे तो हिरावून घेत आहेत, मतदार याद्यांवरून काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार जयराम रमेश यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळाची तुलना सध्याच्या मोदी सरकारच्या कार्यकाळाशी केली.

जयराम रमेश यांनी X वर एक पोस्ट शेअर करत राजीव गांधी सरकारच्या निर्णयाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “ही दोन पंतप्रधानांची गोष्ट आहे. एका पंतप्रधानांनी डिसेंबर १९८८ मधील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यघटनेच्या कलम ३२६ मध्ये दुरुस्ती करून मतदानाचे किमान वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केले. हे ते पंतप्रधान होते ज्यांनी तरुणांना सक्षम केले.”

‘सध्याच्या पंतप्रधानांना तरुणांची भीती वाटते’

त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “दुसरे असे पंतप्रधान आहेत ज्यांनी २०२४ पासून मतदार याद्यांचे स्पेशल समरी रिव्हिजन थांबवले आहे. पात्र असणाऱ्या Gen Z मतदारांची नोंदणी होऊ नये, याची ते काळजी घेत आहेत. हे असे पंतप्रधान आहेत ज्यांना तरुणांची भीती वाटते, ज्यांनी त्यांच्या आशा आणि आकांक्षा धुळीस मिळवल्या आहेत.” एका पंतप्रधानांनी Gen Z ला मतदानाचा हक्क दिला, तर दुसरे तो गैरमार्गाने हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.