
बिहारमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव नाही. जमुई आणि समस्तीपूर येथील धक्कादायक घटनांनंतर आता बिहारच्या बांका जिल्ह्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बांका येथील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या मंदार हिल येथे एका महिलेची छेडछाड करत तिला चप्पलेने मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ६ अज्ञात तरुण महिलेशी अश्लील वर्तन करताना आणि तिला चप्पलेने मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. ही घटना ३ सप्टेंबरची असल्याचे समजते. २२ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ मंदार हिल येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली.
या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो दखल घेत ६ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, कलम ७५, कलम ७६ आणि कलम ३(५) अंतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बिहारमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
काही दिवसांपूर्वीच बिहारच्या जमुई येथे कोचिंग क्लासेसवरून परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आणि तिच्या मित्राला घेरून आरोपींनी छेडछाड करत मारहाण केली होती. तसेच समस्तीपूर येथेही अशीच घटना घडली होती. जमुई घटनेतील मुख्य आरोपींना पोलिसांनी चकमकीनंतर ताब्यात घेतले असतानाच, आता बांका येथील या घटनेमुळे बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेवर आणि महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




























































