ज्ञानेश कुमार यांच्या गुप्त मोहिमेचा पर्दाफाश – पवन खेडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवरून देशात निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार पवन खेडा यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केंद्र सरकार संविधानविरोधी असल्याचा आरोप करत, एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून देशभरातील १३ कोटींहून अधिक मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याचा दावा केला आहे.

शुक्रवारी इंदूरमध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना पवन खेडा म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संविधानाच्या शिल्पकारांनी एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे मांडली होती की, प्रत्येक मताचे मूल्य समान असेल. मात्र सध्या सत्तेत असलेले लोक इतके संविधानविरोधी आहेत की, त्यांनी मतदारांची व्हीआयपी आणि सामान्य नागरिक, अशा दोन वर्गात विभागणी केली आहे.”

पवन खेडा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “आमचे ज्ञानेश कुमार यांचे एक गुप्त अभियान सुरू होते. मात्र आता ते गुप्त राहिलेले नाही, ते सर्वांसमोर आले आहे. संधू आणि जोशी (निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी) यांनी त्यांचा हा खेळ उधळून लावला आणि सर्व काही उघड झाले.”