नांदेडमध्ये अपक्ष नगरसेविका मीनल पाटील यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड विमानतळाच्या रन वे क्षेत्रालगत अनधिकृतरित्या बांधकाम केल्याबाबत नांदेड महापालिकेतील अपक्ष नगरसेविका मीनल गजानन पाटील यांच्यासह गजानन तुकाराम पाटील यांना नांदेड महापालिकेच्या तरोडा सांगवी क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. हे प्रकरण अंगलट आल्यास त्यांचे नगरसेवकत्व धोक्यात येवू शकते.

मंजूर नकाशाविरुद्ध अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून मीनल पाटील व गजानन पाटील यांना २८ सप्टेंबर रोजी आपली बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्यासही सांगितले आहे. महापालिकेने दिलेल्या या नोटीसमुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मीनल पाटील यांनी सांगवीच्या प्रभाग क्र.३ मधून शिंदे गटाच्या करुणाबाई कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करुन भाजपा महापौरांना पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिंदे गट आणि अपक्ष गटात निवडणुकीच्या काळात चांगलाच राडा झाला होता.

नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळाच्या फनल झोनमध्ये संरक्षण भिंती लगत रनवे क्षेत्रामध्ये गजानन तुकाराम पाटील आणि मीनल गजानन पाटील यांचा भूखंड आहे. या भूखंडावर आरसीसी स्वरूपाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम महापालिकेच्या मंजूर नकाशाविरुद्ध करण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामप्रकरणी नांदेड महापालिकेने पाटील यांना १ जून २०२६ रोजी कलम ५३ (१) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. तरोडा – सांगवी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी या प्रकरणात दिलेल्या नोटिस अनुसार ज्याप्रमाणे परवानगी दिली आहे त्याप्रमाणे बांधकाम करण्यात आले नाही. विकास करण्यासाठी दिलेली परवानगी नाकारण्यात आलेली असतानाही बांधकाम करण्यात आले. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत इमारतीचे बांधकाम पाडण्यात यावे, अनधिकृत उपयोग बंद करावा तसेच बांधकाम बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. महापालिकेने केलेल्या पाहणीत ग्राउंड फ्लोअरवर २४६.०४९ चौरस मीटर अनाधिकृत बांधकाम करण्यात आले आहे तर फर्स्ट फ्लोअरवर २३९.५११ आणि सेकंड फ्लोअरवर २५६.२११ चौरस मीटर इतके अनधिकृत बांधकाम असल्याचेही स्पष्ट झाले. यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने महापालिकेने २१ सप्टेंबर २०२६ रोजी नोटीस देत गजानन पाटील आणि मीनल पाटील यांना सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत कळविले आहे. त्यात मालकी हक्काबाबतच्या आवश्यक कागदपत्रांसह २८ सप्टेंबर रोजी उपस्थित राहून आपली बाजू मांडावी, सुनावणीस गैरहजर राहिल्यास आपले काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून आपल्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. कडून नांदेड विमानतळ संचालकांनी विमान वाहतूक सुरक्षिततेच्या आणि सुरक्षित व नियमित वाहतुकीच्या हितासाठी या प्रकरणात नांदेड महापालिका आयुक्तांना एक पत्र लिहून या बांधकाम प्रकरणात आपण त्वरित हस्तक्षेप करण्याबाबत कळविले आहे.