Asian Games 2026 – कबड्डीच्या मॅटवर हिंदुस्थानचाच दबदबा! महिला संघाची ‘सुवर्ण’ कामगिरी, इराणला लोळवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला कबड्डीमध्ये हिंदुस्थानने पुन्हा एकदा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. शेवटपर्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या लेकींनी इराणचे कडवे आव्हान मोडून काढतले. अंतिम सामन्यात हिंदुस्थानने इराणचा 37-34 असा पराभव केला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. यासह यंदाच्या स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. याआधी हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुरूची सिंह आणि कमलजीत यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

अंतिम फेरीपर्यंत हिंदुस्थानचा प्रवास तुलनेने सोपा राहिला होता. मात्र अंतिम सामन्यात हिंदुस्थानपुढे इराणचे आव्हान होते. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मध्यांतरापर्यंत हिंदुस्थानचा संघ 22-16 असा एकूण 6 गुणांनी आघाडीवर होता.

दुसऱ्या सत्रात इराणने जोरदार पुनरागमन केले. इराणच्या खेळाडूंनी एकामागोमाग एक गुण घेत सामना 27-26 असा बरोबरीत आणून ठेवला. इराणने ऑलआऊट मिळवत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र दबावातही हिंदुस्थानने संयम कायम ठेवला. संजू देवी हिने सुपर रेड करत सामन्याचे पारडे पुन्हा हिंदुस्थानच्या बाजुने झुकवले. त्यानंतर कर्णधार पुष्का राणाने ऑलआऊट मिळवत हिंदुस्थानची आघाडी भक्कम केली.

इराणने शेवटपर्यंत हार मानली नाही. सुपर टॅकल करत इराणने हिंदुस्थानवर दबाव कायम ठेवला. अखेरच्या क्षणी हिंदुस्थानच्या बचावबळीने भक्कम खेळ करत इराणला गुण मिळवू दिले नाही आणि 37-34 असा थरारक विजय मिळवला.

पुरुष संघाचीही इराणशी गाठ

महिला संघाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा पुरुष संघाकडे लागल्या आहेत. पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात हिंदुस्थानपुढे इराणचे तगडे आव्हान असणार आहे. उपांत्य फेरीत हिंदुस्थानने थायलंडचा 66-28 असा धुव्वा उडवत, तर इराणने चीनी तैपेईचा 59-21 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. याआधी 2010, 2014 आणि 2022 मध्येही अंतिम फेरीत हिंदुस्थान आणि इराणचा संघ आमनेसामने आला होता. प्रत्येक वेळी हिंदुस्थानने इराणचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते. आताही हिंदुस्थानच्या संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.