‘एक दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारतोय…’, खोडसाळपणा करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला एस. जयशंकर यांचे सडेतोड उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेमध्ये हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एका पाकिस्तानी पत्रकाराने खोडसाळ प्रश्न विचारला. दहशतवादाच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारणाऱ्या या पाकिस्तानी पत्रकाराला जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिले. जयशंकर यांनी एका वाक्यात पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केली.

न्यू यॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बोलत असताना एका पाकिस्तानी पत्रकाराने त्यांना मध्येच अडवून दहशतवादाशी संबंधित एक खोडसाळ प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तुमचे सरकार पाकिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी घालणे कधी बंद करणार? हिंदुस्थान सरकार पाकिस्तानमधील प्रॉक्सी टेररिझम कधी थांबवणार, हे तुम्ही सांगू शकाल का? असा बिनबुडाचा प्रश्न पाकिस्तानी पत्रकाराने विचारला.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अत्यंत संयमाने आणि गंभीरतेने हा प्रश्न ऐकून घेतला. त्यानंतर त्यांनी अवघ्या एका वाक्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर देत पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केली. एक दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारत आहे, असे म्हणत जयशंकर हसले आणि तिथून निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे.

तत्पूर्वी एस. जयशंकर यांनी समुद्रात प्रवास करणाऱ्या नाविकांच्या सुरक्षेबाबत भरवलेल्या एका महत्त्वाच्या परिषदेत सहभाग घेतला. समुद्रातील नाविकांवर होणारे प्राणघातक हल्ले कोणत्याही परिस्थितीत थांबलेच पाहिजेत, अशी खंबीर भूमिका हिंदुस्थाने यावेळी मांडली. अशा प्रकारचा हिंसाचार आणि प्राणहानीचे कोणतेही समर्थन केले जाऊ शकत नाही. सोप्या शब्दांत सांगायचे तर, हे हल्ले तात्काळ थांबलेच पाहिजेत. जगभरातील सागरी कर्मचाऱ्यांमध्ये हिंदुस्थानचा मोठा वाटा आहे. त्यामुळे टनेजच्या दृष्टीने सर्वात मोठी शिपिंग रजिस्ट्री असलेल्या लायबेरिया या देशासोबत हिंदुस्थानने हातमिळवणी केली आहे, असे जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

समान हितसंबंध असलेले देश आणि प्रमुख जहाजांच्या मालकांना आम्ही एका व्यासपीठावर आणले आहे. ‘ग्रुप ऑफ फ्रेंड्स’च्या आमच्या पहिल्याच बैठकीत 25 देश सहभागी झाले होते. ही उपक्रमशीलता सागरी कर्मचारी आणि व्यावसायिक जहाजांशी जोडलेल्या समस्यांकडे जगाचे लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न आहे. सध्या जगातील मर्चंट फ्लीट चालवणारे जवळपास 20 लाख नाविक अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत आहेत, असेही जयशंकर म्हणाले.