दुर्गापूजेचा उत्साह अनुभवायचा असेल तर हिंदुस्थानातील या पाच शहरांना भेट द्यायलाच हवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दुर्गापूजेला सुरुवात होईल. हिंदुस्थानात प्रत्येक सणांचे असे खास महत्त्व आहे. दुर्गापूजा म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर कला, संस्कृती, संगीत आणि खाद्यसंस्कृतीचा अनुभव देणारा सोहळा आहे. देशातील अनेक शहरांमध्ये दुर्गापूजेची धूम पाहायला मिळते.

कोलकाता हे दुर्गापूजेचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. विविध थीमवरील भव्य मंडप, रोषणाई, ढाकचा पारंपरिक नाद आणि स्ट्रीट फूडमुळे संपूर्ण शहर उत्सवाच्या रंगात रंगून जाते.

दिल्लीमध्ये बंगाली समाजाच्या दुर्गापूजा मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. चित्तरंजन पार्क परिसरातील पंडाल, बंगाली पदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरतात. यासोबतच रामलीलाही पाहायला मिळते.

मुंबईत सांताक्रूझ आणि लोखंडवाला परिसरातील विविध दुर्गापूजा मंडळांमध्ये मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक बंगाली विधींसोबत मुंबईची ग्लॅमरची झलकही येथे पाहायला मिळते.

गुवाहाटीमध्ये शेकडो रोषणाई केलेले पंडाल, पारंपरिक पूजा आणि रात्रीचे बाजार पाहता येतात. दुर्गापूजेसोबत कामाख्या मंदिर आणि आसामचे निसर्गसौंदर्यही अनुभवता येते.
कटकची दुर्गापूजा ‘चांदी मेढा’साठी प्रसिद्ध आहे. देवीच्या मूर्ती आणि पंडालांवर चांदीच्या नक्षीदार कामाचा वापर केला जातो. पारंपरिक मिरवणुका आणि उत्सवी वातावरण हे या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.