आम्ही अधिकारांचे रक्षण करू, विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनांवर सरन्यायाधीशांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात विद्यार्थ्यांची सुरू असलेली निदर्शने आणि कॉक्रोच जनता पार्टी (CJP) या विद्यार्थी संघटनेच्या वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी मोठे विधान केले आहे. पाटणा येथील चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले आहे की, शांततापूर्ण मार्गाने विरोध प्रदर्शन करणे हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क असून न्यायव्यवस्था या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

गेल्या काही काळापासून न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. ज्यातूनच कॉक्रोच जनता पार्टी या विद्यार्थी चळवळीने उग्र रूप धारण केले होते. या संघटनेने अलीकडच्या काळात देशभरातील अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक आणि धोरणात्मक प्रश्नांवर रस्त्यावर उतरून मोठा लढा उभा केला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान, विद्यार्थ्यांच्या वाढत्या असंतोषावर सरन्यायाधीशांनी दिलेल्या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आपल्या संवादात त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले की, जोपर्यंत आंदोलने लोकशाही मार्गाने आणि शांततेत सुरू आहेत, तोपर्यंत त्यांच्या हक्कांवर गदा येणार नाही. न्यायव्यवस्थेवर तरुणांचा विश्वास कायम राहावा आणि त्यांनी आपले प्रश्न अहिंसक मार्गाने मांडत राहावेत, असाच सकारात्मक संदेश सरन्यायाधीशांनी या माध्यमातून दिला आहे. या विधानामुळे आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला आता एक प्रकारे बळच मिळाले असल्याचे मानले जात आहे.