
तांत्रिक बिघाड झाल्याने विमान कोसळून दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लष्करी अधिकाऱ्यांसह शिष्टमंडळातील सदस्य आणि विमान कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. काँगोमधील केन्गे येथे ही घटना घडली. अपघाताबाबत सखोल तपास सुरू आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हे विमान नैऋत्येकडील किकविट शहरातून राजधानी किनशासाकडे परतत होते. यादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते केन्गे येथे कोसळले. या अपघातात विमानातील 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लष्करी न्यायालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मुटोम्बो कातालायी टिएन्डे आणि सशस्त्र दलांचे ऑडिटर जनरल लेफ्टनंट जनरल बाकुमी लिकुलिया यांचा समावेश आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.



























































