
हिंदुस्थानी क्रिकटपटू विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. वृद्धांची देखभाल करणाऱ्या, ठाण्यातील एका केअर सेंटरमध्ये दिसणाऱ्या कांबळी यांचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे का? त्यांना केअर सेंटरमध्ये राहण्याची वेळ का आली? असे प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. मात्र, कांबळी यांनी स्वतः या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने ओळख निर्माण करणाऱ्या कांबळी यांच्या या व्हिडीओमुळे त्यांच्या आरोग्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी केअर सेंटरमधील वातावरण आणि तेथील व्यवस्थेबद्दल बोलताना दिसत आहेत. “मी सध्या निदानमध्ये आहे. इथल्या सुविधा खूप चांगल्या आहेत,” असे ते सांगतात. तसेच, या ठिकाणी स्वच्छता आणि इतर सर्व व्यवस्था उत्तम असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. केअर सेंटरमध्ये मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आणि आदराबद्दल कांबळी यांनी समाधान व्यक्त केले. “मला इथे राहताना कधीही असे वाटत नाही की मी घरी नाही. इथल्या लोकांकडून मला खूप प्रेम आणि आदर मिळत आहे,” असे ते व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात. मात्र, कांबळी या केअर सेंटरमध्ये नेमके कोणत्या कारणामुळे आहेत, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कांबळी यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. तर काहींनी त्यांनी पुन्हा क्रिकेटशी संबंधित काम करावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. एका चाहत्याने कांबळी यांनी पुन्हा कॉमेंट्रीच्या क्षेत्रात परतावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने त्यांना वृद्धाश्रमात का नेण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला आहे.































































