
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिह्यात एका पोलीस चौकीवर आज भीषण आत्मघाती हल्ला करण्यात आला. त्यात 11 जणांचा मृत्यू, तर 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन पोलीस चौकीवर धडकवून स्फोट केला. ही चौकी रस्त्याला लागून होती. हल्ला करण्यात आला त्या वाहनात मोठ्या प्रमाणावर फळांच्या पेटय़ा होत्या. स्फोटानंतर सर्व पेटय़ा तुटून विखुरल्या. या स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने घेतली आहे. या संघटनेचा अफगाण तालिबानसोबत जवळचा संबंध आहे.






























































