
देशातील मतचोरी व निवडणूक घोटाळ्यांचे कथित सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विराट जनमोर्चाची हाक दिली आहे. येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत हा मोर्चा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सोशल मीडियात पोस्ट करून मोर्चाची घोषणा केली. ‘देशातील सत्ताधारी पक्षाची शाखा असल्याप्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची घोर फसवणूक केली आहे. या फसवणुकीच्या विरोधात हा मोर्चा आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मोर्चाची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र यावे आणि मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.
सर्व राजकीय पक्षांशी संवाद साधणार
‘एसआयआरविरोधातील या मोर्चासाठी शिवसेना आणि मनसेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे. तो एका पक्षापुरता मर्यादित न राहता तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरला पाहिजे. त्यात सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे यासाठी आम्ही सर्वांशी संवाद साधणार आहोत, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.
इंडिया आघाडीची बुधवारी बैठक
दिल्लीतही घडामोडींना वेग आला असून ‘इंडिया’ आघाडीची बुधवार, 30 सप्टेंबर रोजी काॅन्स्टिटय़ुशन क्लब येथे बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. त्यासंदर्भात चर्चा करून पुढील रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे. दरम्यान, डावे पक्ष आणि ममता बॅनर्जीदेखील मतभेद विसरून एकत्र आल्या आहेत.

























































