मंत्र्यांच्या गाड्या अडवून जेलमध्ये गेलेले चांगले, राष्ट्रवादीचा पंढरपुरात मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायबाप जनता दुष्काळात होरपळत असताना आढावा बैठकीत सत्ताधारी मंत्री काजू-बदाम खात असतील तर अशा मंत्र्यांच्या गाडय़ा अडवून जेलमध्ये गेलेले चांगले असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. शक्तीपीठासाठी 80 हजार कोटी देता, शेतकऱयांना शक्तीपीठाची नव्हे; तर सरसकट कर्जमाफीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुळे बोलत होत्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार राजू खरे, आमदार नारायणआबा पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, नागेश फाटे, दिपक वाडदेकर यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शक्तीपीठ मार्गाला एवढा विरोध असेल तर तो कशासाठी केला जातोय? या रस्त्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, जे पैसे शक्तिपीठ रस्त्यासाठी खर्च करणार आहात ते कर्जमाफीसाठी द्या अशी मागणी करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, जनता दुष्काळात होरपळत असताना मंत्री काजू-बदाम खात असतील तर अशा असंवेदनशील मंत्र्यांच्या गाडय़ा अडवून जेलमध्ये गेलेले चांगले, असा हल्लाबोल त्यांनी केला.